सातारा : साप चावलेल्या पेशंटला रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे उपचाराविना दवाखान्याबाहेरच तडफडत आपला जीव सोडावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील मायणी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर पेशंटच्या नातेवाईकांसह नागरिक संतप्त झाले आहेत.


मारुती आडके असे दुर्दैवी मृतकाचे नाव आहे. त्यांना त्याच्या आनफळे गावातील घरात साप चावल्यामुळे त्याला त्यांच्या नातेवाईकांनी मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मारुती यांना रुग्णालयात आणले त्यावेळी दवाखान्यात डॉक्टर नव्हते. त्यामुळे तुम्हाला येथे ठेवता येणार नाही म्हणून तुम्ही पेशंटला वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जा, असे तिथे उपस्थित एका कर्मचाऱ्याने सांगितले.

आमच्याकडे मोठे वाहन नाही असे नातेवाईकांनी सांगून आम्ही आता पेशंटला कुठे घेऊन जाणार, अशी विनवणी नातेवाईकांनी केली. मात्र तरीही मारुती आडके यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नर्सने नकार दिला. या संपूर्ण घटनाक्रमात सर्पदंश झालेले मारुती हे रुग्णालयाबाहेर अक्षरशा तडफडत होते.

अखेर कशीबशी वाहनाची व्यवस्था करुन मारुती यांना वडूजला नेण्यात आले. त्या ठिकाणीतरी उपचार मिळतील असे वाटत होते, मात्र वडूजमध्येही डॉक्टर उपस्थित नव्हते. या गोंधळात उपचाराविनाच मारुती आडके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाईक संतप्त झाले असून नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेरच मृतदेह ठेऊन संबधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

तर घटना दुर्दैवी आहे. डॉक्टरच नाहीत, रिक्त पदे आहेत. मी मेडिकल रजेवर आहे, तरी आलो आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी डॉ. इन्नूस शेख यांनी दिली आहे.