शिर्डी  : रोज वर्तमान पत्रात मुख्यमंत्री कोण होणार हे छापून येतंय. माझ्यासाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही. मात्र मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडवाव्यात. अन्यथा ही आग वाढत गेली तर सत्तेची आसन सुद्धा जळून राख झाल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


ते श्रीरामपूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? या बातम्या येत आहे. पण माझं त्याकडे लक्ष नाही. ज्यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची आग आहे त्यांना शेतकरी जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि माझे चांगले संबंध आहेत. लपवण्यासारखं काहीच नाही. पण याचा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी करणार करणार असल्याचेही ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, सरकार विरुद्ध मी आता बोलत नाही. आमचं आता जुळलंय. युती करताना शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती ही प्रमुख अट ठेवली आहे, असेही ते म्हणाले. आपलं सरकार आणत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात हे पाहण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.



शेतकऱ्यांना विमा कंपन्या भरपाई देत नाहीत. कर्जमाफी सगळ्यांना भेटली नाही. यामुळेच पुणतांब्यात शेतकऱ्यांनी संप केला त्यावेळी आम्ही पाठींबा दिला. केवळ अन्नदाता सुखी भव म्हणून चालणार नाही.  तुम्ही राजे आहात आणि तुमच्यासाठी आता राज्यात फिरणार, असल्याचेही ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणाले.

यावेळी ठाकरे यांनी खासदारांना काम नसेल तर दिल्लीला जाऊ नका, शेतकऱ्यांची कामे असतील तर मतदार संघात थांबा, असा सल्ला दिला.

पीक विमा योजनेत दलालांनी हप्ते भरून घेतले आहेत. दलालांनी पैसे वर पोहेचवले नसल्याची तक्रार आहे. सर्व विमा कंपन्यांची ऑफिस मुंबईत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फसविणाऱ्या कुणाला पळून जाऊ देणार नाही. मल्ल्या किंवा मोदी होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.