शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले, बैठकीत परभणीच्या पराभवावरून वादावादी
एबीपी माझा वेब टीम | 23 Jun 2019 02:00 PM (IST)
परभणी लोकसभा मतदारसंघात राजेश विटेकर यांचा पराभव कुणामुळे झाला? यावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियावर कुणी काय कमेंट केली या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच पेटले.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत परभणीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका सुरू आहेत. या दरम्यान परभणीतील लोकसभेच्या पराभवावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले. मुंबईमध्ये आज मराठवाडा विभागातील जिल्ह्यांचा आढावा शरद पवार घेत आहेत. यामध्ये परभणी जिल्ह्याचा आढावा घेण्याची बैठक सुरू होण्याआधी राजेश विटेकर आणि आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. परभणी लोकसभा मतदारसंघात राजेश विटेकर यांचा पराभव कुणामुळे झाला? यावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी प्रामुख्याने सोशल मीडियावर कुणी काय कमेंट केली? या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच पेटले. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत मध्यस्थी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवले. तसेच अधिकची कुमक देखील पोलिसांना मागवावी लागली. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते.