मुंबई / नागपूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. उद्धव आणि त्यांचे चिरंजीव आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची मोहन भागवतांसोबत जवळपास तासभर चर्चा झाली.


नोटाबंदीसंदर्भात शिवसेनेच्या भूमिकेवरुन सरसंघचालकांशी चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे इतर राजकीय बाबींवरही चर्चा झाल्याचं उद्धव यांनी सांगितलं.

नागपुरातील रेशीमबागेत असलेल्या रा. स्व. संघाच्या मुख्यालयात उद्धव ठाकरे यांची भागवतांशी चर्चा झाली. उद्धव ठाकरे संघ मुख्यालयात दाखल झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सुद्धा तिथे दाखल झाले होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कन्या केतकीच्या विवाह सोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे नागपुरात आहेत. मात्र लग्नाला उपस्थिती लावण्यापूर्वी उद्धव ठाकरे मोहन भागवतांच्या भेटीला गेले.