पालघर : वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून 21 नोव्हेंबरला केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray)  पक्षाने  पाठिंबा दिला असून शिवसेना नेते आणि कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे . मी स्वतः वाढवण येथे येईन पंधरा दिवसांनी वाढवण येथे सभेचे आयोजन करावे असेही उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.  सदैव  आम्ही आंदोलनकर्त्यांन बरोबर उभे राहू असे ही त्यांनी आश्वासन  दिले.


पालघर जिल्ह्यासह मुंबईपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत  वाढवण संघर्ष पेटला असून या संघर्षाची धग केंद्र सरकारला बसणार आहे. महाराष्ट्रातील हजारो मच्छीमार बांधव केंद्र सरकारच्या कृतीविरोधी पेटून उठला असून 21 नोव्हेंबर सोमवारी मच्छिमार बांधवांसह आदिवासी कष्टकरी आझाद मैदानावर धडक देणार आहेत. वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये या संदर्भातले 15  खटले सुरू असताना बंदर उभारणीबाबत केंद्र सरकार हालचाली करत आहे या प्रकाराचा निषेध तसेच वाढवण बंद रद्द करा या एकच मागणीसाठी हे मच्छीमार आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडक देणार आहेत.


प्रस्तावित महाकाय वाढवण बंदर प्रकल्पास विरोधात  21 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र व राज्य सरकार विरोधात मंत्रालयावर आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलन धारकांनी आज मातोश्रीवर भेट घेऊन निवेदन देऊन विनंती केली. त्यावेळेस आझाद मैदानावर शिवसेना नेते उपस्थित राहतील. आपण पंधरा दिवसानंतर पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात भव्य सभेचे आयोजन करावे. मी स्वतःच सभेला उपस्थित राहून प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी आंदोलनात तुमच्या सोबत येईन. असे आश्वासन दिले. तसेच शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत व सचिव मिलिंद नार्वेकर यांना मुंबईतील कोळी समाजातील शिवसैनिकांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना आदेश देण्याची सूचना केली


या शिष्टमंडळात माजी महापौर मिलिंद वैद्य, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती सरचिटणीस वैभव वझे, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, (MMKS), सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष मोरेश्र्वर पाटील, सदस्य दर्शना पागधरे, मोरेश्र्वर कोळी, दशरथ चौधरी,  ठाणे जिल्हा मच्छिमार समाज संघाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, (MMKS),  पालघर जिल्हा अध्यक्ष मानेंद्र आरेकर, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती, (MMKS)पालघर जिल्हा महिला सचिव प्राची नाईक  महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती (MMKS),पालघर तालुका अध्यक्ष प्रशांत नाईक , आदिवासी कष्टकरी संघटनेचे सुनील मालवकर,दिलिप कोरे उपस्थित होते.