Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी जायकवाडी धरणातून येणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आहे. महापालिकेची 700 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगावजवळ शुक्रवारी फुटली होती. तिच्या दुरुस्तीला 27 तास लागले असून, शनिवारी सायंकाळी शहराकडे पाणी झेपावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर होणार आहे. तर औरंगाबादकरांना 12 ते 15 तास उशिराने पाणी येणार आहे.
औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून दोन वेगवेगळ्या जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान सातशे मिमी आणि बाराशे मिमी व्यासाच्या दोन मुख्य जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र या जलवाहिनी खूप जुन्या झाल्याने सतत फुटत असतात. दरम्यान पैठण रोडवर नवीन पाणीपुरवठा योजनेची तिसरी मोठी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी तीन वाजता जेसीबीचा धक्का लागल्याने सातशे मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्याने रस्त्यासह शेतात पाणीच पाणी पाहायला मिळाले.
याबाबत माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जायकवाडी येथील तीन पंप बंद करून जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तर कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली. विशेष म्हणजे रात्री लाईटच्या उजेडात देखील काम करण्यात आले. यावेळी जुना पाइप मिळण्यास अडचण येत असताना, एका ठिकाणाहून त्या डायमीटरचा पाइप आणून अखेर जलवाहिनी जोडण्यात आली. तर हा पाइप जोडण्याचे काम सुरू करण्यास सकाळ उजाडली.
12 ते 15 तास उशिराने पाणी
जलवाहिनी जोडण्याचे काम दुपारी 4 वाजता पूर्ण झाले. इतर कामे करून सायंकाळी 5 वाजता काम पूर्ण झाले. त्यामुळे या कामासाठी तब्बल 27 तास लागले. त्यानंतर जायकवाडी येथील बंद केलेले तीनही पंप सुरू करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता नक्षत्रवाडी येथील सम्पमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली. मात्र यामुळे शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत झाला असून, शहरात अनेक ठिकाणी 12 ते 15 तास उशिराने पाणी येणार आहे.
या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत...
सातशे मिमीच्या जलवाहिनीतून येणारे पाणी थांबल्याने शनिवारी नक्षत्रवाडी, कांचनवाडी,वेदांतनगर, हमालवाडा, सिल्कमिल कॉलनी, सादातनगर, विश्वभारती कॉलनी, क्रांतीचौक येथील जलकुंभ कोरडेठाक होते. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा बारा ते पंधरा तास उशिराने केला जाणार आहे. आजचे रात्रीचे टप्पे रविवारी दुपारनंतर पूर्ण केले जातील असे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.