Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाची लढाई निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे यांनी जिंकली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. त्यातच आता शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.  शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 


योगेश देशपांडे काय म्हणाले?
आतापर्यंत या सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली होती. ही जागा कुणाची आहे, कुणाच्या नावावर आहे? सर्वसामान्यांचा असा समज होता, की ही शिवसेनेची जागा आहे. असाच माझाही समज होता. हे गोपनियता बाळासाहेबांनीच ठेवली होती का? याबाबत मी अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचं समोर आले. मग कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? परवानगी नसताना राजकीय पक्षाचं कार्यलाय, इतक्या दिवस का वापरलं, असा प्रश्न उपस्थित होतो, असे योगेश देशपांडे म्हणाले. 


कारवाई करा, अन्यथा नुकसान भरपाई करा, असे तक्रारीत अभय देशपांडे यांनी म्हटलेय. "शिवाई ट्रस्ट" हेच नाव सूचित करते की ते सार्वजनिक ट्रस्ट आहे. दुर्दैवाने तुमच्या कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींमुळे, आम्ही आज वेबसाइटवरून अधिक माहिती मिळवू शकलो नाही.


खालील प्रश्न उद्भवतात:- 


1. पब्लिक ट्रस्टच्या कार्यालयाचा वापर अनेक  दशके-वर्षांपासून राजकीय कार्यांसाठी कसा केला जात आहे?


2.  जर असा वापर ट्रस्टच्या उद्दिष्टांचे उल्लंघन करत असेल, तर विश्वस्तांना  का निलंबित/काढले जाऊ नये आणि प्रशासक का नियुक्त करू नये?


3. आतापर्यंत झालेले नुकसान विश्वस्तांकडून का वसूल केले जाऊ नये?


उपरोक्त मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे पत्र सार्वजनिक हितासाठी आमची औपचारिक तक्रार मानून पुढील कारवाईसाठी तुमच्या निरीक्षकांना त्वरित अहवाल देण्याचे आदेश द्या.


ज्यांनी शंका उपस्थित केली आहे, त्यांना कायदेशीर उत्तरे दिली जातील, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बंधनकारक नाही. संबधित अधिकाऱ्यांना उत्तर देऊ, असे परब म्हणाले. सर्व कायदेशीर मार्गाने शिवसेना भवन उभं आहे, असे अनिल परब म्हणाले.