Uddhav Thackeray PC : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या निर्णयावर आक्षेप घेण्यात येत आहे. आता निवडणूक आयोगच बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करावा. कोर्टात यांची मनमानी चालणार असं होणारं नाही. सध्या गुंतागुंत वाढावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करत सध्याचा निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
"आता 16 जण गेले त्यानंतर 23 अपात्र केल्याची नोटीस दिली आहे. दोन तृतीयांश एका पक्षात विलीन व्हायला हवेत मात्र तसं झालेलं नाही. मधल्या काळात एक वादग्रस्त आयुक्त नेमले गेले आणि घाईघाईत त्यांची नियुक्ती कशी काय झाली याचं उत्तर द्यायला हवं. निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे. गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला का? काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत असाच वाद झाला होता. बाकी कुणालाही अशा प्रकारे देण्यात आलेलं नाही. मधल्या काळात बातम्या आल्या की बोगस शपथपत्र आम्ही दिली आहेत. मात्र याची चौकशी झाली आणि असं काहीचं नसल्याचं समोर आले. आम्ही लाखोंनी कागदपत्रं दिली, मात्र त्याचं पुढं काय झालं? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिलं आहे. त्यामुळं आता सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आशा आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांचे फोन आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. " या निकालानंतर मला शरद पवार, ममता बॅनर्जींचा फोन आला. नितीश कुमारांचा देखील फोन आला. शरद पवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधून, शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हातून गेल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
नाव आणि चिन्ह चोरण्याचा पूर्वनियोजीत कट
"माझं नाव आणि चिन्ह चोरलं आहे. हा पूर्वनियोजीत कट आहे. माँ साहेबांच्या पोटी जन्माला मी आलो आहे हे भाग्य त्यांना मिळणारं नाही. हे भाग्य त्यांना चोरता नाही किंवा दिल्लीला देखील देता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 2024 सालची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींची शेवटची निवडणूक ठरू शकेल. कारण त्यांचा यांनतर देशात नंगानाच सुरु होणार आहे. आता जर जागे नाही झालो तर उशीर होईल. आता सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कोल्हापुरात बोलताना अमित शाह मला वडिलांसारखे आहेत असं म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी यावेळी यावरूनही जोरदार टीका केली. "कोण तरी म्हणाले अमित शाह माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे वडील चोरले आणखी कुणा कुणाला चोरणार माहिती नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या