Sanjay Raut PC : शिवसेना ( Shiv Sena ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर ( Matoshree ) जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर ( BJP ) निशाणा साधला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत स्पष्टच सांगितलं की, शिवसेना एकच आहे, यामध्ये गट वगैरे काही नाही. 


यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'संजय राऊत माझा जीवलग मित्र आहे. तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाही.' संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अटकवलं जाऊ शकतं असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मातोश्रीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत.


शिवसेना एकच गट वगैरे काही नाही : संजय राऊत


संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे, गट वगैरे काही नाही. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, 'शिवसेना एक कुटुंब आहे. उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. या विश्वासामुळे मी तुरुंगाच निश्चिंत होतो. शिवसेनेसाठी मला 10 वेळा जरी तुरुंगात जावं लागलं तरी मी जाईन. पक्षासाठी काही करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला गेल्या 40 वर्षांत भरभरुन दिलंय. पक्षाशी बेईमानी करणार नाही. स्वत:ची सुटका करायची म्हणून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.'


पाहा व्हिडीओ : ठाकरे आणि राऊतांची संयुक्त पत्रकार परिषद



संजय राऊत संकटात लढणारा धाडसी मित्र : उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर निशाणा साधला. संजय राऊत हा शिवसेना नेता आहे, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि माझा जिवलग मित्र आहे.  मित्र तोच असतो, जो संकटाच्या काळात न डगमगता लढतो. संकटासोबत राहून संजय लढतोय. काल न्यायालयाच्या निकालामुळे सगळं स्पष्ट झालं आहे. मी न्यायदेवतेचे आभार मानतो. या निकालात न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागतायत हे स्पष्ट आहे. बेकायदेशीरपणे केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरु आहे. 


उद्धव ठाकरेंचा विरोधकांना मिश्किल टोला


यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना लांब पल्ल्याची तोफ म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना मिश्किल टोला लगावत म्हटलं आहे की, संजय राऊत तोफ आहेत. तोफ-तोफच असते. या तोफेचा पल्ला तुम्हाला माहित आहे. 


'संजयला तसं करायचं असतं, तर...'


केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवत आहेत. न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय त्यांनी संजय राऊतांच्या धाडसाचं कौतुक केलं. शिवाय संजय राऊत फडणवीसांना भेटणार असल्याची चर्चा आहे, त्यावरून वेगवेगळी समीकरण बनवली जात आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, संजयला तसं करायचं असतं. तर ते त्याने परखडपणे केव्हाच केलं असतं.