मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना पुन्हा एकदा चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा होईपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना दिले आहेत. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबत रत्नागिरीत माहिती दिली.

"कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे. शेतकरी कर्जातून बाहेर पडला पाहिजे. सातबारा उतारा कोरा झाला पाहिजे. ही मागणी कालही उद्धवसाहेबांची होती आणि आजही आहे", अशी माहिती शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी रत्नागिरीत दिली.

यावेळी रामदास कदम म्हणाले, “जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत हे अधिवेशन चालू देऊ नका, असे स्पष्ट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे सर्व आमदारांना आहेत.”

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळं बुधवारी कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचा गदारोळ पाहायला मिळू शकतो. अधिवेशन सुरु झाल्यापासूनच दोन्ही सभागृहात गदारोळच सुरु आहे. त्यात आता सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेची भर पडणार आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यानही शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा जोरदारपणे लावून धरला होता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिल्यानंतर, शिवसेनेने महाराष्ट्रात त्याच मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याच मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शिवसेना सरकारला घरचा आहेर देत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे.

सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेना अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कशाप्रकारे आक्रमक रुप घेते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी भाजप मंत्र्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.