धाराशिव : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा अमित शाह (Amit Shah) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. "मी पक्षप्रमुख नाही असे भाजपकडून (BJP) सांगितले जात आहे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट अमित शाह यांनी केलेल्या फोनचा किस्सा भर सभेत सांगितला. 'उद्धवजी आप को आना होगा' असा फोन निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतांना शाह यांनी केल्याचं ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी शिवसेना पक्षप्रमुख नाही असे म्हणायाला यांनी सुरवात केली आहे. पण इथे जमलेल्या लोकांना विचारा शिवसेना कोणाची आणि पक्षप्रमुख कोण आहे. ज्यांना नामांतर कोणी केलं माहिती नाही. मी पक्षप्रमुख नाही म्हणता, मग मातोश्रीला का आले होते. स्वतः अमित शाह यांनी फोन केला आणि अहमदाबादमधून फॉर्म भरताना बोलवलं. वाराणसीमध्ये मोदींचा फॉर्म भरतांना फोन केला आणि 'उद्धवजी आप को आना होगा' असे शाह म्हणाले. तुमचे उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे पाहिजे होता. शिवसेना आणि ही संपत्ती माझी वडिलांपोर्जीत आहे, शाह तुमचा अधिकार नाही, असे ठाकरे म्हणाले.
वाघ विरुद्ध लांडगे...
दरम्यान, याचवेळी उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील दोघांना जवळ बोलावून हे माझे दोन वाघ असल्याचा उल्लेख केला. तसेच निष्ठा कोणाला म्हणतात हे असेही म्हणाले. तर, “ही लढाई वाघ विरुद्ध लांडगे, निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी आहे. ही गद्दारी आणि बेईमान तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रशी करणार आहात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
उद्या आपले सरकार दिल्लीत येणार...
"आज महाशिवरात्री आहे, महिला दिन आहे. पण मणिपूरमध्ये जे घडलं, महिला कुस्तीपटू यांनी टाहो फोडला, पण त्यांची दखल कोणी घेतली नाही. मग कोरड्या शब्दाने कशा तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या?, महिलांना माझी विनंती आहे, आता शुभेच्छा घेऊ नका माहिषशूर मर्दणीचा रुप घ्या. उद्या आपले सरकार दिल्लीत येणार, आणावं लागेल,” असे ठाकरे म्हणाले.
नार्वेकरांना लालच दाखवून माझ्या विरोधात निकाल दिला...
बंगालमध्ये गंगोपध्याय हे न्यायमूर्ती आता भाजपमध्ये गेले आहेत. खुर्चीवर असताना त्यांनी अनेक निर्णय दिले. नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे लालच दाखवून माझ्या विरोधात निकाल दिला. सर्वोच न्यायलायाने देखील म्हटलं नार्वेकर यांचा निकाल सर्वोच न्यायलय विरोधात वाटतं नाही काय?, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझं वचन अपूर्ण आहे
भाजपने पाठीत वार केलं. अमित शाह यांनी शब्द दिला होता, तो त्यांनी नाकारला. मी बाळासाहेब ठाकरेंना वचन दिला होता की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. पण मी स्वतः मुख्यमंत्री होईल असं म्हटलेलं नव्हतं. त्यामुळे माझं वचन अपूर्ण आहे. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी आता तुमच्यावर देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, पाहिजे जेव्हा घातलं नको तेव्हा सोडलं.
गरज असतांना मातोश्री, गरज संपली की अडाणी, भाजप हा वापरून फेकून देणारा पक्ष आहे. संकटकाळात ज्यांनी मदत केली त्यांना संपवण्याचे काम यांचे सुरु आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे आमचे कुटुंबीय होते. गडकरी यांना तिकीट अद्याप नाही, पंकजा मुंडेंचं काय करणार काय माहित. मोदी आणि शाह यांचे नावं देखील कुणाला माहित नव्हते तेव्हा मुंडे आणि महाजन होते. आम्ही तुमच्यासोबत युती केली होती, 2014 मध्ये भाजपने युती तोडली. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, पाहिजे जेव्हा घातलं नको तेव्हा सोडलं. आम्ही तुम्हाला खांद्यावर घेतलं, नाहीतर तुम्हाला चार खांदे ही मिळाले नसते. 'अब समय आया है शिवसेना खतम करो' असं म्हणतात. तुम्ही शिवसेनाच खतम करणार काय? असे ठाकरे म्हणाले. तर, मुंडेंचा राजकीय अस्तित्व संपवण्याचे काम यांच्याकडून सुरु आहे. पंकजा विरोधात मी उमेदवार दिला नव्हता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :