मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत. रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांचा विवाहसोहळा आज (2 मार्च) औरंगाबादमध्ये पार पडणार आहे.


खरंतर उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. शिवाय रावसाहेब दानवेंच्या मुलाचं आजच औरंगाबादमध्ये लग्न आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ‘मातोश्री’वर

दोन्ही लग्नांचा मुहूर्त संध्याकाळचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे औरंगाबादला न जाता कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.

दरम्यान रावसाहेब दानवेंनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या एक दिवस आधी (22 फेब्रुवारी) ‘मातोश्री’वर  जाऊन उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं.

युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेच संकेत देण्याच्या मूडमध्ये शिवसेना नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जात आहे.