अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकाविरोधात अकोल्यात आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतं.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण करु, असा इशारा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे.
आंदोलनावर यशवंत सिन्हा ठाम
अकोल्यात आंदोलन छेडल्यानंतर पोलिसांनी सिन्हा यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारीही दाखवली. मात्र, त्यांनी नकार देत झाडाखाली झोपणं पसंत केलं. शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतीबाबत ठोस आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्यावर आंदोलक ठाम आहेत.
स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात
पीएशी बोला, फडणवीसांचा सिन्हांना निरोप : पटोले
यादरम्यान यशवंत सिन्हा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांनी फोनवर येणं टाळून सिन्हांना पीएशी बोला असा निरोप दिलां. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाच डावलल्याची भावना आहे, असा आरोप भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी केला आहे.
...तर वरुण गांधी, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा अकोल्यात!
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोला पोलिस मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेल्या यशवंत सिन्हा यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा आणि वरुण गांधी पाठिंब्यासाठी थेट अकोल्यात येणार आहेत. खासदार नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.