Uddhav Thackeray on Eknath Shinde : कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या लेटेस्ट पॅरोडीमुळे वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम शूट झाला होता तो त्यांनी उद्ध्वस्त केला. शिवसैनिकांनी केलेल्या या तोडफोडीनंतर कुणाल कामराने नवी पोस्ट केली. कामराने एक फोटो पोस्ट केला, त्यामध्ये संविधानाची प्रत हातात धरली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "हाच एक मार्ग आहे." त्याच्या विडंबन व्हिडिओप्रमाणे ही पोस्ट देखील व्हायरल झाली आहे. काही तासांतच ही पोस्ट 15 लाख लोकांनी पाहिली. लाल रंगाची संविधानाची ही छोटीशी प्रत अलीकडे खूप चर्चेत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हाती ही प्रत नेहमीच दिसून आली आहे. संविधानाच्या बचावासाठी त्यांनी संविधान प्रत हाती घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. 


ते सत्यात्मक गाणं केलं आहे


दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन कुणाल कामराने केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, व्यंगात्मक गाणं केलं नाही, ते सत्यात्मक गाणं केलं आहे. त्यानं जनभावना मांडल्या आहेत, आम्ही आजही बोलत आहोत. चोरी करतात ते गद्दार आहेत. काल कुणाल कामराच्या ठिकाणी केलेली तोडफोड शिवसैनिकांनी केली नाही, त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, असे ते म्हणाले. सीएम फडणवीसांच्या सुपारी घेऊन बोलतात या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला. मग नागपूरची, थडग्याची सुपारी कोणी दिली? गद्दारांचं उद्दातीकरण मान्य आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. 



तोडफोड 'एसंशिं' गटाने केली असेल


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड झाल्यानंतर ती शिवसैनिकांनी केली नसल्याचे म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'एसंशिं' (एकनाथ संभाजी शिंदे) अशा नव्या शब्दाचा वापर केला. ही तोडफोड 'एसंशिं' गटाने केली असेल, गद्दार गटाच्या एकसंशिंग गटाने केली असेल, अशी टीका त्यांनी केली. छत्रपती शिवराय की गद्दारांच्या आदर्शाने राज्य चालवायचं आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 


छत्रपतींचा अपमान चालतो, गद्दारांचा चालत नाही 


त्यांनी सांगितले की, तथाकथित गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं आणि तोडफोड केली. यांना शिवरायांचा अपमान करणारा कोरटकर, राहुल सोलापूरकर दिसत नाही, कोश्यारीचा निषेध दिसत नाही. हे भेकडं, हे गद्दार असल्याची जनभावना असल्याचे ते म्हणाले. न्याय सारखाच पाहिजेत, नागपुरप्रमाणे तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करून कामराच्या  जागेची नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. छत्रपतींचा अपमान चालतो, गद्दारांचा चालत नाही. त्यांच्याकडून दामदुपट्टीने वसूल करावी. गद्दारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य  कसं म्हणता? असे ठाकरे म्हणाले. पोलिसांचा दरारा कमी करण्याचा प्रयत्न आहे. वाटेल ते करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.