मुंबई : महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असल्याची चिन्हं आहेत. सातत्यानं वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा पाहता यामुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. सध्याच्या घडीला कोरोना संसर्गाची एकंदर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री आणि इतर नेतेमंडळींच्या सातत्यानं होणाऱ्या बैठकांवरच अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.


मुख्य म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्णय आणि इतर महत्त्वाची पावलं उचलली जाणार का, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच संपर्कात असणाऱ्या काही व्यक्तीचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 


काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामागोमाग मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोना संसर्ग झाल्याची बाब समोर आली. मुख्यमंत्र्यांच्या घरातच कोरोनानं शिरकाव केल्याचं वृत्त ताजं असतानाच आणखी एक चिंता वाढवणारं वृत्त समोर आलं. हे वृत्त म्हणजे, अभिनेता आमिर खान कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं. 


Coronavirus: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासात 28,699 नव्या रुग्णांची भर


काही दिवसांपूर्वीच आमिरनं एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” पार पडला त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हजर होते. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता कोरोना काळात सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हा कोरोना अगदी जवळ पोहोचला आहे. परिणामी ही चिंतेची बाब असून, आता काही दिवसांपूर्वी राज्यातील नागरिकांशी संवाद साधत असताना दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पुन्हा एकदा ऑनलाईन स्वरुपाच्याच कार्यपद्धतीला प्राधान्य देत कोरोनापासून दूर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, राज्यात मंगळवारी 28,699 कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि 13,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,30,641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.