दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे राज्यातील माध्यमं, राजकीय विश्लेषक आणि नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.
आज (22 नोव्हेंबर) मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. काही महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वात आधी या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. परंतु शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेंकडून अद्याप त्यास दुजोरा मिळालेला नाही.
नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तसेच महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यास अद्याप संमती दिलेली नाही.
मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. त्यामुळे आघाडीतीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे स्वीकारणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर महाविकासआघाडीची सहमती, शरद पवारांची माहिती | मुंबई | ABP Majha
मुख्यमंत्रीपदाचा आग्रह उद्धव ठाकरेंनी स्वीकारला, संजय राऊतांची एबीपी माझाला माहिती | ABP Majha