मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. राऊत यांच्या या माहितीनंतर महाराष्ट्रात 'ठाकरे' सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मुख्यमंत्रिपदाचा आग्रह म्हणा किंवा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची माहिती संजय राऊतांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टेबल वाजवून निर्णयाचं स्वागत केलं. दरम्यान बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत सेना नेत्यांनी काही काळासाठी उत्सुकता ताणली. मात्र अखेर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह स्वीकारला असल्याचे राऊत यांनी सांगितले.


महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ ने त्यांची वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. ही बैठक अद्याप सुरु आहे. परंतु काही महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बाहेर पडले. नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी माहिती मिळत आहे. तेसच महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला.

मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाली आहे.

दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. परंतु ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती पहिल्यांदाच मंत्रीपदावर विराजमान होणार आहे.