मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांची आज पहिली संयुक्त बैठक पार पडली. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? महाविकासआघाडी सत्तास्थापनेचा दावा कधी करणार? या प्रश्नांची उत्तरे आजच्या बैठकीनंतर मिळतील, अशा आशा राज्यातील जनतेला होत्या. परंतु महाविकासआघाडीच्या चर्चा अद्याप संपलेल्या नाहीत, असे चित्र आता दिसू लागले आहे.

या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद बोलावली होती. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जंयत पाटील या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी पृथ्वीराच चव्हाण यांनी सांगितले की, तिन्ही पक्षांमध्ये आज बैठक झाली. या बैठकीला तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. परंतु अद्याप आमच्यातील चर्चा संपलेली नाही, उद्या आमची अजून एक बैठक होणार आहे.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी पटेल म्हणाले की, आज आमच्यात चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आम्ही बसणार आहोत.

दरम्यान, महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वात आधी या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.

नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तसेच महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला.