Rajan Salvi Viral Photo : 'आमदार नाही तर शिवसैनिकच' अशा आशयाची एक पोस्ट आणि फोटो सध्या कोकणात प्रचंड व्हायरल होतांना पाहायला मिळत आहे. हा फोटो आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजापूर- लांजा आणि साखरपा येथील आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांचा. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच कोकण दौरा केला. नगर जिल्ह्यातल्या राजापूर येथे 5 फेब्रुवारी रोजी छोटेखानी सभा घेतली. राजन साळवी यांच्या मतदारसंघात होणारी सभा स्वाभाविक साळवी यांच्यासाठी महत्त्वाची होती. यावेळी, सभेची तयारी करताना साळवी पहाटे चार वाजेपर्यंत जवाहर चौकात होते अशी माहिती कार्यकर्ते देतात. यावेळी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर साळवी यांनी सभेच्या ठिकाणी असलेल्या एका सोफ्यावरवरती जवळपास तासभर झोप काढली. त्यांचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
आमदार साळवी यांनी सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या ते तीन टर्म आमदार आहेत. पण त्यानंतर देखील हॉटेल किंवा कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी न जाता त्यांनी सभेच्याच ठिकाणी तासभर झोप काढली. सध्या त्यांचा हा फोटो समाज माध्यमांवर व्हयरल होत आहे.
एसीबीच्या कारवाईमुळे चर्चेत...
शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर राजन साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ देतील अशी चर्चा होती. पण, मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा राहणार, माझ्यावर कितीही दबाव टाकला तरी मी जुमानणार नाही अशी भूमिका राजन साळवी यांनी घेतली. दरम्यान, याच काळात त्यांच्यामागे एसीबी चौकशी लागली. आतापर्यंत साळवे यांची एसबीकडून जवळपास सात वेळा चौकशी झाली. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर देखील रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा भाऊ, वहिनी, पुतण्या आणि स्वीय सहायकांची देखील चौकशी करण्यात आली. असं असलं तरी राजन साळवे यांनी अद्याप अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला नाही. पत्नी आणि मुलासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर हायकोर्टात धाव घेतली आहे. याबाबतची सुनावणी सोमवारी होईल. पण काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही अशी भूमिका राजन साळवी यांनी घेतली आहे.
राजन साळवींची राजकीय कारकीर्द
जुना आणि निष्ठावंत शिवसैनिक अशी राजन साळवी यांची ओळख आहे. साधारणपणे 1995 च्या दरम्यान राजन साळवी रत्नागिरीमधून नगरसेवक झाले. त्यानंतर नगराध्यक्ष पदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. या दरम्यान राजन साळवी यांच्या खांद्यावरती जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदार देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे ते जिल्हाप्रमुख होते. सन 2000 मध्ये शिवसेनेच्या सभासद नोंदणीमध्ये राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी केली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला. दरम्यान 2006 मध्ये झालेल्या राजापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीमध्ये राजन साळवी यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण, त्यानंतर राजन साळवी आमदार झाले. सध्या राजन साळवी रत्नागिरी - लांजा - साखरपा या मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार आहेत. मालमत्ता वाढीप्रकरणी साळवी यांची सध्या अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. पण हे सर्व राजकीय दबावापोटी सुरू असून, मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
पत्नी आणि मुलासाठी राजन साळवींची मुंबई हायकोर्टात धाव, आज सुनावणी, जामीन मिळणार का?