नागपूर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सध्या राज्यात वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांमध्ये (Sanjay Shirsath) आरक्षणावरून खडाजंगी रंगली आहे. मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेन, मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे, त्यांची शपथ वाया जाऊ नये,असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे. तर भास्कर शेठना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ, असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.
भास्कर जाधव म्हणाले, मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेल. सरकार तिघाचं असलं तरी मुख्यमंत्र्यांना हार घालणार आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. अनेक गरजूंना मदत, मेहनती आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे. आरक्षण दिल्यावर श्रेयवादाची लढाई होईल पण मी शिंदे साहेबांचा सत्कार करेल. मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे, त्यांची शपथ वाया जाऊ नये ही इच्छा आहे.
भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे: संजय शिरसाट
संजय शिरसाट म्हणाले, आम्ही मराठा समाजासाठी काम करत आहे. आम्ही दाखले द्यायला सुरुवात केली, आधी काहीच होत नव्हतं . भास्कर जाधव माझे मित्र आहेत त्यांना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ . आम्ही आरक्षणाला लागणारा डेटा तयार करत आहोत. भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास : भास्कर जाधव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देणार असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील आमचा विश्वास आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
सर्वपक्षीय आमदारांचं पायऱ्यांवर फोटोसेशन
विधानभवनात आज फोटोसेशनच्या वेळी सर्व पक्षाचे आमदार एकत्रित पाहायला मिळाले. एवढंच नाही तर या फोटोसेशनच्या वेळी अगदी खेळीमेळीचे वातावरण होतं. यादरम्यान काही हास्यविनोद सुद्धा झाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे हेवेदावे विसरुन, सर्व आमदार खेळीमेळीत पाहायला मिळाले. शिवसेना कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे.मात्र या फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसताना दिसले. त्यावेळी बाजूला देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.
हे ही वाचा :
Bhaskar Jadhav : भुजबळांवर तुटून पडले, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढले; भास्कर जाधवांचे विधानसभेतील घणाघाती भाषण