मुंबई/ठाणे : सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या प्रचार धुमाळीत सर्वाधिक गाजतोय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मनमोहन सिंह यांना निष्क्रीयतेच्या पुतळ्याची उपमा देत मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं, त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सैनिकांच्या बिकट अवस्थेचं श्रेयही सरकारनेच घेण्याचा सल्ला दिला.


राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या दोन प्रमुख पक्षांमधल्या नेत्यांनी असं एकमेकांवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्यानंतर ठाण्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही बरसले. त्यांनी एका बाणात दोन्ही पक्षांवर वार करत, इतकाच तिटकारा असेल, तर सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेनेला दिला.

रविवारचा मुहूर्त साधून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारांचा धडाका लावला. अंधेरीत मुख्यमंत्र्यांनी भाषणासाठी हिंदीचा आधार घेतला. तर शिवसेना पक्षप्रमुखांनी बालेकिल्ला गोरेगावात प्रचारसभा केली. तर पवारांनी ठाण्यातून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलं.

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

बाळासाहेब काँग्रेस विरोधात लढले आणि आज शिवसेना काँग्रेसचं कौतुक करते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मुंबईत भाजपने नव्हे, तर काँग्रेसने मेट्रो आणली, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

पाकिस्तान आपल्यावर हल्ला करायचं आणि काँग्रेस बोलायचं आम्ही उत्तर देऊ. पण मोदींसारखे शेर जन्माला आले, ज्यांनी आमच्या जवानांना मारलं तर तुमच्या देशात घुसून मारू, अशी भीती पाकच्या मनात भरुन दिली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

नोटाबंदीचा उद्धव ठाकरेंना काय त्रास? : मुख्यमंत्री

नोटाबंदीच्या काळात लोकांनी त्रास सहन केला. पण उद्धव ठाकरेंना नोटाबंदीचा काय त्रास झाला, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

सीमेवर लढणारा सैनिक 5 गोळ्या लागूनही जगला, पण सैनिकाला नोटाबंदीमुळे आत्महत्या करावी लागली. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलणाऱ्यांना लाज वाटायला हवी. 2014 ला हा देश जन्माला आला, अशी काहींची समजूत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेणाऱ्या सरकारने जवानांच्या खाण्याच्या निकृष्ट जेवणाचे श्रेय घेण्याची तयारी दाखवावी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

नोटाबंदीचा फटका हा गर्भवती महिलांना बसला. नोटाबंदीमुळे रांगेत 200 लोकांचा मृत्यू झाल्याचा मला त्रास झाला. मी मुख्यमंत्र्यांसारखा दगडाच्या हृदयाचा नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं.

नोटाबंदीचा फटका किती बसला, हे 23 तारखेला निकालानंतर कळेल, असंही सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत. शिवाय मुंबईबाबत आमच्याशी बोलताना जपून बोला. आयुक्त तुम्ही बदलून दिले आहेत, त्यांच्याकडून हिशोब मागा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान आम्ही मुंबईत शेर आहोतच, पण बाहेरही आम्हीच शेर आहोत. नागपूरमध्ये भाजपने पैसे ओरबडले ते मुंबईत जमले नाही म्हणून ओरड आहे का, असा सवालही उद्दव ठाकरेंनी केला.

ठाण्यातून पवारांचं मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर शरसंधान

भाजपकडून शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पण महापालिकेत शिवसेना आणि भाजप सत्तेत आहे. शिवाय शिवसेनेचे नेते गुंडगिरी करतात, असा भाजपचा आरोप आहे. मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे ही जबाबदारी कुणाची, असा सवाल करत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे हे अगदी मोदींपासून राज्यातील भाजपवाले कसे आहेत हे सांगतात आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसतात. शिवसेनेला सत्तेची ऊब बाहेर पडू देत नाही, असा टोलाही शरद पवारांनी शिवसेनेला लगावला.