पुणे : राजकारणात मी वैयक्तिक द्वेष आणि वैर ठेवत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भविष्यातील राजकारणाबाबत अपेक्षाही व्यक्त केली. ते म्हणाले, पुण्यात ज्याप्रकारे अंकुश काकडेंनी सर्व पक्षांतील नेत्यांना कट्ट्यावर एकत्र केलं, तसं व्हायला हवं.
पुण्यात 12 व्या ‘राम कदम कलागौरव’ पुरस्काराने प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना गौरवण्यात आले. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते अनुराधा पौडवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची दिलखुलास मुलाखत घेतली. पवार दाम्पत्याने मनमोकळेपणाने वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील अनुभव उपस्थितांना सांगितले.
“तुमच्या विचारसरणीच्या विरुद्ध टोकाची विचारसरणी असलेल्या लोकांशीही तुम्ही चांगले संबंध ठेवता हे तुम्हाला कस जमतं?” असा प्रश्न सुधीर गाडगीळांनी पवारांना विचारल्यानंतर, ते म्हणाले, “राजकारणात मी वैयक्तिक द्वेष आणि वैर ठेवत नाही. आज माझं वय 76 वर्षे आहे. पुढची पिढी काय करेल, ते माहिती नाही. परवा अंकुश काकडेंनी निवडणुकीनंतर सर्व पक्षातील नेत्यांना कट्ट्यावर एकत्र केलं. तस एकत्र यायला हवं. आता राजकारणात चांगले संबंध असले, म्हणून सगळंच काही खरं बोललं जातं असं नाही.”
याचवेळी मोदींबाबत बोलताना पवार म्हणाले, “कुणी म्हणतं, माझं बोट पकडून राजकारणात आलो वगैरे. पण यातून एवढच समजायच की, बोलायला हुशार आहे. पण ते तसं नाही. हे पुणेकरांनी आता झालेल्या महापालिका निवडणुकीतही सिद्ध केलं.”
कुटुंबस्नेही पवार
“माझ्या बायकोने परिधान केलेली प्रत्येक साडी मी खरेदी केलेली आहे. त्यामुळे मला गेली 50 वर्षे आठवड्यातील 6 दिवस बाहेर दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळत राहिली, असे शरद पवार म्हणाले. शिवाय, गुगली गोलंदाजाच्या मुलीबरोबर लग्न केलं. त्यामुळं आयुष्यभर विकेट जात राहिली आणि आताही गेली, अशी मिश्किल शेरेबाजीही पवारांनी यावेळी केली.
प्रतिभा पवार या दिवंगत भारतीय गोलंदाज सदू शिंदे यांच्या कन्या आहेत.
गोविंदराव तळवळकर आणि यशवंतराव चव्हाण
गोविंदराव तळवळकरांचं वाचन हा चमत्कार होता. गोविंदरावांनी इंग्रजी भाषेतील कोणतं पुस्तक वाचलं नाही, हे शोधावं लागेल. यशवंतराव चव्हाणांचं वाचन तळवळकरांच्या जवळ जाणारं होतं, असे पवार म्हणाले.
गदिमा आणि शरद पवार
गदिमांसोबत खूप जुना स्नेह होता. आटपाडीजवळच्या माडगूळ गावातील व्यक्ती फारसं शिक्षण नसताना एवढं उमदं काव्य लिहू शकते, हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणून बारामतीत गदिमांच्या नावाने कलादालन उभारलं, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. शिवाय, किशोरी अमोनकर आवडती गायिका, तर भीमसेन जोशी आवडते गायक असल्याचे सांगायलाही पवार विसरले नाहीत.