अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करावा, खासदार उदयनराजे आक्रमक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 07 Sep 2016 12:24 PM (IST)
पुणे : अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. साताऱ्यात होणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चातही उदयनराजे सहभागी होणार आहेत. अॅट्रोसिटी कायद्यात बदल नव्हे, तर तो रद्दच झाला पाहिजे, असं म्हणतानाच अॅट्रोसिटीच्या 90 टक्के केसेस बोगस असतात, असा दावाही उदयनराजेंनी केला आहे. कोण काय म्हणालं याच्याशी मला देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी शरद पवारांना लगावला. पवारांनी अॅट्रोसिटी कायद्यात बदल करण्याचं सुचवलं होतं, त्याबाबत प्रश्न विचारला असता, उदयनराजेंनी उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी केलेली नाही. त्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर शासकीय यंत्रणांनी त्यामध्ये लक्ष घालून गैरसमज दूर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच सवर्णच दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर करतात, असंही माझ्या निदर्शनास आल्याचं पवार म्हणाले होते.