सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या प्रश्नाला दिलेल्या चुकीच्या उत्तरामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. उदयनराजेंच्या वक्तव्यावरुन माध्यमांमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर उदयनराजे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून याबाबत खुलासा केला आहे. यावेळी उदयनराजे म्हणाले की, "मी जे बोललो नाही, ते दाखवले गेले आहे. माध्यमांनी टीआरपीसाठी चुकीचे वृत्त प्रसारित केले आहे."

एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'मुलं मुलींकडे बघणार नाहीत तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न केला. या वक्यव्यामुळे सर्वच स्तरातून उदयनराजेंवर टीका केली जात आहे. या टीकेनंतर उदयनराजे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून खुलासा केला आहे.

याबाबतचा खुलासा करताना उदयनराजेंनी माध्यमांनाच दोषी ठरवत, "मी जर चुकलो तर माझी चुक दाखवा, मी जर बोललो असेल तर ते दाखवा आणि जर मी तसे बोललो नसेल तर ते दाखवणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

परंतु माध्यमांनी उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्या व्हिडीओमध्ये उदयनराजे काय बोलत आहेत हे स्पष्ट ऐकू येतंय. उदयनराजे जे बोलले, माध्यमांनी तेच दाखवले आहे. त्यामुळे उदयनराजेंनी खुलासा करताना केलेला दावा पटत नाही.

पाहा नेमकं काय म्हणाले होते उदयनराजे?



काल (शुक्रवार) साताऱ्यातील कोरेगाव मधील 'डी. पी. भोसले महाविद्यालया'मध्ये उदयनराजे गेले होते. त्यावेळी एका विद्यार्थिनीने 'मुलं छेड काढतात' अशी तक्रार केली. 'मुलं पाठलाग करतात, मागे येऊन ओव्हरटेक करतात, मुली स्टँडवर थांबल्या की, गाडी जवळच उभी करुन त्यांच्याजवळ उभी राहतात, त्यांना सारखं बघतात' असं गाऱ्हाणं उदयनराजेंसमोर मांडलं. परंतु यावर उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरामुळे सर्वच अवाक झाले.

मुलीचं गाऱ्हानं एकल्यानंतर उदयनराजे म्हणाले की, 'मी काय उत्तर देऊ मलाच कळत नाही. मात्र ही गोष्ट नॅचरल आहे. तुम्हाला थोडा त्रास होईल, पण मुलं मुलींकडे बघणार नाहीत, तर काय मुलांकडे बघणार का?' असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी तक्रारदार विद्यार्थिनीला विचारला. त्यानंतर उदयनराजे म्हणाले, 'याचा अर्थ असा नाही की कोणत्याही प्रकारची विकृती त्यांच्यात असली पाहिजे. ती विकृती जर असली तर आपण मला येऊन सांगा. आपण जातीने त्याच्यात लक्ष घालू, संबंधित व्यक्तीला समजून सांगण्याचं काम करु'.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यार्थांशी संपर्क साधून मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी उदयनराजे महाविद्यालयांमध्ये जाऊन नवमतदारांशी बातचित करत आहेत.