मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर
एबीपी माझा वेब टीम | 22 Mar 2019 10:55 PM (IST)
शिरुरमधील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा प्रश्न विचारत भाजपच्या गोटातील आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांनी असहकाराची भूमिका घेतली आहे.
पिंपरी चिंचवड : मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर येत आहे. शिवसेनेने शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील भाजप गटाने बैठक घेतली. आमदार महेश लांडगे यांच्या गटातील सर्व नगरसेवक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार न करण्याचा मनस्थितीत आहेत. आढळराव पाटलांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे दबावतंत्र वापरलं जात आहे. अपक्ष निवडून आलेले लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली जात आहे.