यवतमाळमध्ये गटार साफ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 May 2019 09:33 PM (IST)
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वेकोली वणी क्षेत्राच्या कैलासनगर वसाहतीत आज सकाळी 10 च्या सुमारास गटार साफ करताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. हनुमान कोडापे आणि महादेव वाघमारे अशी मृतकांची नावे आहेत. हे दोघेही येनक या गावचे रहिवासी आहेत. सुनील शर्मा या कंत्राटदाराकडे काम करणारे हे दोन्ही कामगार गटार साफ करण्यासाठी खाली उतरले होते. मात्र तीव्र उन्हाळा असल्याने आणि गटारातील गॅसमुळे गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला. सायंकाळी कैलास नगर वसाहतीतील मैदानात क्रिकेट खेळणारी मुलं चेंडू आणण्यासाठी गटाराजवळ गेले असता त्यांना मृतदेह दिसून आले. ही घटना समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यानंतर शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. कामगारांना सुरक्षेची साधनं ठेकेदाराकडून देण्यात आली नाहीत. यामुळेच दोन कामगारांचा मृत्यू झाला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मृतकांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.