मुंबई : दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांना, आता एसटीच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याचे टॅंकरद्वारे थेट त्यांच्या गावांमध्ये पोहोचविले जात आहेत. अन्नदाता शेतकरी दुष्काळामुळे प्रचंड अडचणीत आहे. त्याला मदत करण्याच्या हेतूने एसटी महामंडळाकडून काही गावांमध्ये दररोज पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.


9 जिल्ह्यातील 19 गावांमध्ये ही योजना सध्या सुरु केली आहे. त्या गावात पाण्याची समस्या संपेपर्यंत हे टँकर सुरू राहणार आहेत. यासाठी येणारा सर्व खर्च एसटी महामंडळाने उचलला आहे. या उपक्रमाचे सामान्य जनतेकडून कौतुक होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील तीन, नांदेड जिल्ह्यातील तीन, परभणी जिल्ह्यातील एक, हिंगोली जिल्ह्यातील एक, उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन  नाशिक तीन , सातारा जिल्ह्यातील दोन, अहमदनगर जिल्ह्यातील दोन, बुलढाणा जिल्ह्यातील एक अशा नऊ जिल्ह्यांमधील 19 गावांमध्ये एसटी महामंडळाच्या वतीने पाणीपुरवठ्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती असल्यामुळे सामाजिक बांधिलकीची जण ठेवून एसटी महामंडळाकडून या 19 गावांना दत्तक घेऊन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महामंडळाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव या  दुष्काळी गावात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आणि प्रधान सचिव(परिवहन)  आशिष सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटीच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची पूजा करुन उद्घाटन केले गेले.