कोल्हापूर : कामगार नेते आणि विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटीने दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने संशयित आरोपी भरत कुरणे आणि वासुदेव सुर्यवंशी या दोघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात भरत कुरणे हा आता महाराष्ट्र एसआयटीच्या ताब्यात आहे. कुरणे हा गौरी लंकेश यांच्या हत्येत देखील आरोपी आहे.  कर्नाटक सीआयडीकडून एसआयटीने पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकरी बेळगावचा भरत कुरणे आणि मुंबईतील नालासोपाऱ्याचा त्याचा साथीदार वासुदेव सुर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळुरु इथून रात्री ताब्यात घेतले आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, न्यायालयात हजर केल्यानंतर या दोन्ही संशयितांना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांची न्यायालयात केली होती. तर कोल्हापूर SIT तपासाचा खेळखंडोबा करत असून या दोघा संशयितांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करा असे आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांची मागणी होती.

गेल्या 15 दिवसांपासून माझी तब्बेत बिघडली आहे. मला रात्रीच्या वेळी झोपण्यास द्यावं अशी संशयित आरोपी भरत कुरणे याने न्यायालयात मागणी केली होती. दोघा आरोपींना न्यायालयात हजार करताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. न्यायालयाने अखेर या दोघांची 7 दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दोघा आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान दररोज 5 ते 5.30 या वेळात भेटण्याची परवानगी दिली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित अमोल काळेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची पुन्हा बंगळूर कारागृहात रवानगी करण्यात आली. अमोल काळेची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच एसआयटीने भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कारागृहातून ताब्यात घेतले आहे. या दोघांना याआधी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने अटक केले आहे.



भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी अॅड. शिवाजीराव राणे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करत दोघा संशयितांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर कोल्हापूर SIT तपासाचा खेळखंडोबा करत असून या दोघा संशयितांना न्यायालयीन कोठडीत रवानगी करा अशी मागणी आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांची न्यायालयात केली. दोन्ही बाजूकडील तब्बल दीड तास झालेला युक्तिवाद पाहता न्यायालयाने दोघा संशयित आरोपींना 7 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.