नागपूर : नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. अभिलाष खोपडे आणि रोहित खोपडे यांनी क्लाऊड सेव्हन बारमध्ये तोडफोड केल्याचा आणि बारमालाकच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा खोपडेंच्या मुलांवर आरोप आहे.


रविवार 20 नोव्हेंबरच्या रात्री भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष खोपडे आणि क्लाऊड सेव्हनच्या बारमधल्या कर्मचाऱ्यांची भांडणं झाली. त्या भांडणात अभिलाषनं बारची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यावेळी अभिलाषनं आपला धाकटा भाऊ रोहित खोपडेला आपल्या मदतीसाठी बोलावलं. रोहितसोबत असलेला शुभम महाकाळकरही बारमध्ये पोहोचला आणि पुन्हा एकदा भांडणाला तोंड फुटलं. बारमधल्या कर्मचाऱ्यांनी शुभम आणि अभिलाषच्या गाडीची तोडफोड केली.

बारमधून बाहेर पडल्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करुन अर्धा किलोमीटर अंतरावर लक्ष्मीभुवन परसरात गाठलं. तिथेच शुभम महाकाळकरची भोसकून हत्या केल्याचा आरोप शुभमच्या परिवाराने केला आहे. या भांडणाशी कोणताही संबंध नसलेल्या शुभमला या प्रकरणात जीव गमवावा लागल्यानं नातेवाईकांमध्ये संतापाची भावना आहे.

बारमधील तोडफोडी आणि मारामारीनंतर अर्धा किमी अंतरावर झालेल्या शुभम महाकाळकरच्या हत्या प्रकरणात बार मालक सनी बामब्रतवार आणि इतर 7 ते 8 जणांविरोधात हत्येचा (कलम 302) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर क्लाऊड सेव्हन बारच्या सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. बारमध्ये धुडगूस घातल्या प्रकरणी कलम 307 अन्वये अभिलाष खोपडे, रोहित खोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.

शुभम महाकाळकर हा राष्ट्रीय पातळीवर लेझिमचा खेळाडू होता. 26 जानेवरीला दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात गेले तीन वर्ष तो सहभागी होत होता.

संबंधित बातम्या :


नागपूर : शुभमच्या हत्येप्रकरणी बारमधील 6 कर्मचाऱ्यांना अटक


भाजप आमदारपुत्रांचा बारमालकाशी वाद, तरुणाने जीव गमावला