मुंबई : मराठा मोर्चाच्या तयारीपूर्वी शिवसेनेत कोकणातील दोन दिग्गज नेत्यांची दिलजमाई झाली आहे. सर्व जुन्या वादांवर पडदा टाकून नव्याने सुरुवात करण्याचा निश्चय केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.


अनंत गीतेंच्या मुंबईतल्या विलेपार्लेमधील कार्यालयात रामदास कदम यांच्या अनेपक्षित हजेरीमुळे कोकणातील शिवसेनेच्या राजकारणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर आणि संपर्क प्रमुख विजय कदम यांच्या मध्यस्थीने कदम यांनी अनंत गीते यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांच्या प्रचाराला रामदास कदम यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे त्यांच्यातील सुप्त संघर्षाची चर्चा चांगलीच रंगली. गीतेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना रामदास कदम यांचा पाठिंबा असल्याचीही जोरदार चर्चा होती.

या चर्चांमुळे कोणातील शिवसैनिक संभ्रमित अवस्थेत होते. मात्र आता कोकणातून मराठा मोर्चाची तयारी सुरु झाली असून कोकणातील मराठा नेता म्हणून रामदास कदम यांना पक्षश्रेष्ठींकडून तयारीला लागण्याचे आदेश आल्याची सूत्रांची माहिती आहे.  यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुठल्याही व्यासपीठावर एकत्र येणं टाळणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिलजमाई झाल्याचं समोर आलं आहे.

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये 16 ऑक्टोबरला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोकणातील हा पहिलाच मराठा मोर्चा असेल. कोपर्डीतील अत्याचाराचा निषेध आणि अट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून मूक मोर्चे काढले जात आहेत.