चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक 3 आणि 4 ठप्प झाले आहेत. वीज केंद्रात कोळशाच्या तुटवड्यामुळे प्रत्येकी 210 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे हे दोन संच बंद ठेवावे लागत आहेत. 


चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात केवळ दीड दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. सध्या 1 हजार 774 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती येथे होत आहे. या केंद्राची वीज निर्मिती क्षमता 2920 मेगावॅट आहे. तर केंद्राला दररोज 45 हजार मेट्रिक टन कोळशाची गरज आहे. परंतु, सध्या केवळ 60 हजार मेट्रिक टन एवढाच कोळसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दोन संच बंद ठेवावे लागणार आहेत. 


चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला रोज केवळ 27 हजार मेट्रिक टन कोळसा पुरवठा केला जात आहे. नजीकच्या पद्मापूर कोळसा खाणीतून कोळसा पुरवठा रखडल्याने ही स्थिती ओढविली आहे. ऐन हिवाळ्यात वीज निर्मिती कमी झाल्याने एकूण ग्रीडवर परिणाम होणार असल्याची माहिती, मुख्य अभियंते पंकज सपाटे यांनी दिली आहे. 


चंद्रपूर प्रदुषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या वीज केंद्राला पाच कोटीचा दंड 
दरम्यान, मागच्याच आठवड्यात राष्ट्रीय हरित लवादा कडून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने राष्ट्राय हरित लवादानं हा दंड ठोठावला आहे. चंद्रपूर एमआयडीसीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राविरुद्ध हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने राष्ट्रीय हरित लवादाकडे ही याचिका वळती केली.  


महत्वाच्या बातम्या