पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील दोन तरुण सेल्फी काढण्याच्या नादात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. बंधाऱ्यावर सेल्फी काढत असताना दोन तरुण भीमा नदीत वाहून गेले. दोघांचा शोध सुरु आहे.


सध्या उजनी व वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरुन वाहू लागली आहे. अशात सेल्फीचे फॅड तरुणाईच्या डोक्यात शिरल्याने दुर्घटना घडू लागल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील लक्ष्मण सिताराम खंकाळ आणि स्वप्निल सिताराम शिंदे दोन मित्र वाहून गेले आहेत.


रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण आणि स्वप्निल गुरसाळे बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. सेल्फी काढून झाल्यावर मोटारसायकल धुवत असताना स्वप्निल शिंदे हा बंधाऱ्यावरून घसरुन पाण्यात पडला. त्यावेळी त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लक्ष्मणने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यात दोघेही वाहून गेले.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण अवचर, तहसीलदार मधुसूदन बर्गे व नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या साहाय्याने शोध मोहिम सुरू केली आहे.