जालना : 'ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे, त्यांना सोबत घेऊन, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय' असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. जालन्यात झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी युतीबाबत शिवसेनेला इशारा देतानाच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवरही हल्लाबोल केला.

युतीवर बोललो नाही, तर मीडिया माझ्या भाषणाला किंमत देणार नाही. भाजप लाचार नाही, ज्यांना हिंदुत्ववाद हवा आहे, ते सोबत येतील, ज्यांना नको, त्यांच्याशिवाय भाजप निवडणुका लढवेल. आता आपलं सैन्य तयार करुन लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. युती असली-नसली तरी तुम्ही कामाला लागा, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं.

विकासकामांची माहिती

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या विकासकामांची माहिती दिली. कर्जमाफी, सिंचन, पीक विमा, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील कामांचा पाढा त्यांनी वाचला. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. लोकसभा निवडणुकीपूर्वीची आजची शेवटची बैठक, यानंतरची बैठक विजयानंतरची होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण काढली.

महागठबंधन केलं तरी भाजपला काही फरक पडत नाही

नेतृत्वहीन विरोधक पंतप्रधान मोदींना रोखू शकणार नाहीत. भाजपला रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले पण विरोधकांची ही महाआघाडी कुचकामी ठरेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जे एकमेकांचे तोंड पाहत नव्हते, ते भाजपविरोधात एकमेकांसोबत युती करत आहेत. यांच्या पक्षांना नीती नाही, धोरण नाही, नियम नाही. पण नरेंद्र मोदींच्या भीतीपोटी हे लोक एकत्र आलेत. महागठबंधन केलं तरी भाजपला काही फरक पडत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत पराभव

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निकालावरुनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा की परिवर्तन यात्रा रायगडावरून सुरु केली आणि तिथल्या कर्जतमध्ये भाजपने त्यांना पराभूत केलं. गडचिरोलीच्या आरमोरी नगरपालिकेतही काँग्रेसला जनतेने जागा दाखवली. जनतेने त्यांना दिलेला हा प्रतिसाद आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी नगरपालिकेत त्यांचा पराभव झाला. त्यांचे मिळून जितके नगरसेवक निवडून आले, त्यापेक्षा जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले, असं फडणवीस म्हणाले.

भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना साथ द्या

राफेल प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या थोबाडीत मारली. पण सुधारेल ती काँग्रेस कसली? अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी काँग्रेसवर केली. जे मोदींसाठी हात वर करतील त्यांना निवडून आणू. सत्ता नाही, भारतमातेची सेवा करण्यासाठी मोदींना साथ द्या, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.