जालना : जालन्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरु असतानाच दुसरीकडे जालन्यातील भाजप नेत्याचे भयंकर प्रताप सुरु होते. भाजपच्या किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाने एका शेतकरी कुटुंबातील फक्त पुरुषच नव्हे, तर महिलांनाही जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.

जालन्यातील जाफराबाद तालुक्यात निवडुंगा गावात शेतीच्या वादातून किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांनी ही मारहाण केल्याचा आरोप शेतकरी विठ्ठल खांडेभराड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रावसाहेब भवर आणि विठ्ठल खांडेभराड यांच्यात 28 एकर जमिनीवरुन वाद सुरु आहे. याच जमिनीवर विहीर खोदण्यासाठी रावसाहेब भवर गुंडांसह शेतात जेसीबी घेऊन आले. मात्र त्यांना विरोध केला असता रावसाहेब भवर यांनी मारहाण केल्याचा आरोप महिला शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आली असून भाजपच्या रावसाहेब भवर यांच्यासह 11 जणांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवरची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून हात वर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्याने भवरची हकालपट्टी केल्याची माहिती दानवेंनी दिली. मारहाणीचं कदापि समर्थ करणार नसल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना दिल्याचंही सांगितलं.