डॉ. पोळच्या फार्म हाऊसवर दोन खड्डे, आणखी 9 जण बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2016 05:51 AM (IST)
सातारा : क्रूरकर्मा डॉक्टर संतोष पोळच्या फार्म हाऊसवर आणखी दोन खड्डे आढळून आले आहेत. सहा जणांची हत्या केल्यानंतर डॉक्टर पोळचा पुढचा निशाणा खुद्द त्याची नर्स असल्याची माहिती पुढे आली आहे. नर्सच्या हत्येचा बेत आखण्याआधीच डॉक्टर संतोष पोळनं हे दोन खड्डे खणून ठेवले होते. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान वाई परिसरातील आणखी नऊ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. कसा लागला सुगावा ? 13 वर्षात 6 खून पडले, तरीही डॉ. संतोष पोळ मोकाट होता. मात्र डॉ. पोळचे दिवस भरले तेच अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्याध्यक्ष मंगल जेधे गायब झाल्या त्या दिवशी. 16 जून 2016 ला मंगल जेधे घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबानं पोलिसात तक्रार दिली आणि हाती लागला सर्वात मोठा पुरावा. अर्थात संतोष पोळची मैत्रीण आणि साथीदार ज्योती मांढरे. कोणाच्या हत्या ? साताऱ्याच्या वाईमध्ये मंगल जेधे यांची हत्या करणाऱ्या डॉक्टर संतोष पोळने एकूण 6 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मंगल जेधे, सलमा शेख, नथमल भंडारे, जगाबाई पोळ, सुरेखा चिकणे आणि वनिता गायकवाड अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. हत्या झालेले सहाही जण 2003 ते 2016 या कालावधीत सातारा आणि वाई परिसरातून बेपत्ता होते. यापैकी चार मृतदेह हे डॉ. संतोष पोळच्या फार्म हाऊसवर पुरण्यात आले होते. कसं झालं हत्यांचं प्लॅनिंग ? संतोष पोळ अतिशय थंड डोक्यानं हत्येचं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने महिलांच्या मागावर असायचा. संतोषचा कबुलीजबाब ऐकून अंगाचा थरकाप उडल्याशिवाय राहात नाही. हत्येच्या दोन महिने आधीच तो मोठे खड्डे खणायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.