सांगली : चैन करण्यासाठी आणि गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तब्बल सहा लाख रुपये किंमतीच्या 12 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. साहिल मौला पटेल (वय 21 वर्ष) आणि दगडू रामा कुकडे (वय 19 वर्ष) अशी आरोपींची नावं असून दोघेही महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेत आहेत.


गर्लफ्रेण्डला फिरवण्यासाठी आणि चैन करण्यासाठी साहिल पटेलकडे पैसे नसायचे. त्यामुळे त्याने बाईक चोरीचा मार्ग अवलंबून दुचाकी चोरीची मालिका रचल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. दोघांकडून सांगलीतील सात, तर अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच असे 12 दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. सांगली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ढालगावमध्ये छापा टाकून ही कारवाई केली.

सांगली शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा आणि अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी या गुन्ह्यांची दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. चोरलेल्या दुचाकी त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकल्या होत्या. कागदपत्रे पुन्हा देतो, असं सांगून त्यांनी या दुचाकींची विक्री केली होती.

साहिल हॅण्डल लॉक न केलेल्याच दुचाकी चोरीत असे. त्यानंतर दगडू कुकडे याच्या मदतीने तो दुचाकी विकत असे. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.