मुंबई : नितीन आगे प्रकरणात सरकारकडून आगे कुटुंबीयांची फसवणूक होत असल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला आहे. विशेष सरकारी वकिलाला खटला देण्याऐवजी हरलेल्या वकिलाकडेच पुन्हा नितीन आगेचा खटला देण्यात आला.


हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना आगे कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. ज्या वकिलांनी या केसमध्ये आपली कोणतीच बाजू मांडली नाही, त्याच वकिलांची पुन्हा नेमणूक केल्यामुळे आगे कुटुंबीय नाराज आहे.

नितीन आगेच्या वडिलांना घेऊन रिपाइं नेते अविनाश म्हातेकर आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. विशेष सरकारी वकिल देण्याचं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.

नितीन आगे हत्या प्रकरण काय आहे?

28 एप्रिल 2014 रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन राजू आगेची हत्या झाली होती. नितीन न्यू इंग्लिश स्कूलमधे बारावीला शिकत होता. प्रेमप्रकरणाच्या वादातून नितीनला आरोपींनी शाळेत मारहाण केली होती. मारहाण करतच आरोपींच्या विटभट्टीवर नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर  लिंबाच्या झाडाला नितीनला गळफास दिला होता.

या प्रकरणी सचिन गोलेकरसह 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 3 अल्पवयीन होते, तर एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. हत्येनंतर राज्यात दलित संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं.  त्यानंतर नोव्हेंबर 2016 पासून सुनावणीला सुरुवात झाली. या दरम्यान 26 साक्षीदार तपासले. यापैकी 14 साक्षीदार फितूर झाले होते.

या खटल्यात  नितीनचे वडिल राजू आणि आईचीही साक्ष नोंदवली. आरोपींविरुध्द पुरावे सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवलं. सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता.

नितीन आगे हत्या प्रकरणी नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती. नितीन आगेच्या हत्या प्रकरणी एकूण 26 साक्षीदार तपासले होते. तर 164 कलमानुसार आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. मात्र 13 साक्षीदार फितूर झाले.

शिक्षक बाळू गोरे, रमेश काळे आणि साधना फडतरे आणि शिपाई विष्णू जोरे यांच्यासह 13 जण फितूर झाले. तर नितीनचे आई, वडील, दोन बहीण आणि पंचनामा करणारे तपास अधिकारी आणि शवविच्छेदन अधिकारी हे सरकारच्या बाजूनं राहिले आहेत.

संबंधित बातम्या

नितीन आगे हत्या खटला पुन्हा नव्याने चालणार 

नितीन आगे हत्या : 13 फितूर साक्षीदार कोर्टात हजर राहणार!

नितीन आगे हत्या प्रकरणातील 13 फितुरांवर कारवाई होणार

''कोपर्डी निकालानंतर आनंद व्यक्त करणारे नितीन आगे प्रकरणी गप्प का"? 

'नितीन आगे खूनप्रकरणी हायकोर्टात धाव घेऊ' 

नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार : राजकुमार बडोले