मुंबई : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. दोन्ही पक्ष सध्या आपआपल्या परीने सत्तास्थापनेची चाचपणी करत आहेत. अपक्ष आणि लहान पक्षांच्या जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे वळवून आमदारांचे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करत आहेत.


नुकतेच गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अग्रवाल यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं आहे. तसेच आमदार महेश बालदी यांनीदेखील भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.

भारतीय जनता पक्षाने 105 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार तसेच दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 60 झालं आहे.

सोमवारी भाजपला बडनेराचे आमदार आमदार रवी राणा, मीरा-भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पाठिंबा दर्शवला. आता 2 अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने भाजपचं संख्याबळ 105+3 +2  = 110 इतकं झालं आहे.

राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेना-भाजप महायुतीला 161 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ते सत्तास्थापनेचा दावा करु शकतात. परंतु शिवसेनेने भाजपकडे सत्तेत समान वाटा आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली आहे. भाजपला शिवसेनेची ही मागणी मान्य नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आपआपल्या परीने सत्ता स्थापन करण्याच्या विविध मार्गांची चाचपणी करत आहेत.