शिर्डी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर वारंवार खोटी आश्वासनं देणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. शेतकरी संपाची मशाल पेटविणाऱ्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकरी आंदोलनाची मशाल पेटविण्यात येत आहे. पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठ येथे किसान क्रांतीच्या वतीनं कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यता आली. मात्र या आंदोलनात दोन गट निर्माण झाले असून मागील आंदोलनात सहभागी असलेले धनंजय धनवटे व धनंजय धोरडे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
निवडणुका जवळ आल्याने राजकीय स्वार्थासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आलं आहे, असं मत पुणतांब्याचे सरपंच तथा मागच्या आंदोलनात सोबत असणारे धनंजय धनवटे, बाळासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.
मागील शेतकरी संपाची हाक 1 जून 2017 रोजी पुणतांबा या गावातून देण्यात आली होती. राज्यभरातील शेतकऱ्यांनी संपात सहभागी होत राज्य सरकारला कर्जमाफी देण्यास भाग पाडले. मात्र सरकारने दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण केली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा किसान क्रांती संघटनेच्या माध्यमातून पुणतांबा गावात आंदोलनाची मशाल पेटविण्यात येणार असल्याची माहिती जयाजी सूर्यवंशी यांनी दिली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, दुधाला हमीभाव, शेतकऱ्यांच्या मालाला जाहीर केलेला हमीभाव या निर्णयाची अमंलबजावणी यासह विविध मागण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. मागील वेळी झालेल्या गटातटाच्या राजकारणामुळे यावेळी राज्यभरातील किती संघटना आणि शेतकरी यात सहभागी होतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
तर दुसरीकडे पुणतांब्याचे सरपंच तथा मागच्या आंदोलनात सोबत असणारे धनंजय धनवटे , बाळासाहेब चव्हाण यांनी मात्र स्वार्थासाठी आणि निवडणुका जवळ आल्याने हा अट्टाहास असल्याची भावना व्यक्त केली आहे.