मुंबई : विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी 'उलगुलान मोर्चा' काढला. हा मोर्चा गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाला होता. मागण्या मान्य झाल्यामुळे मोर्चेकरी शेतकरी आज घरी परत जाणार होते. परंतु त्याआधी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या मोर्चामध्ये सहभागी झालेले दोन शेतकरी बेपत्ता झाले आहेत.
संपत सिंगा नाईक (42) आणि फतेह सिंग चौधरी (40) अशी बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही नंदुरबार जिल्ह्यामधून 'उलगुलान मोर्चा'त सहभागी झाले होते. यासंदर्भात आझाद मैदान पोलीस स्थानक आणि चुनाभट्टी पोलीस स्थानक इथे संपत नाईक आणि फतेह चौधरी हे दोन शेतकरी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात अली आहे.
दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारत लाँगमार्च काढला होता. या मोर्चात आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरीही सहभागी झाले होते. हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याने विधानसभेतही याचे पडसाद उमटले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाची दखल घेत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले.
दरम्यान मंत्र्यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सरकारने आंदोलकांना मागण्या मान्य केल्याचे लेखी दिले. त्यानंतर शेतकरी आणि आदिवासी बांधवांना घरी परतण्यासाठी सरकाने विशेष ट्रेनची व्यवस्थाही केली आहे.