शिर्डी: ड्रेनेजमध्ये गुदमरून दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना शिर्डीत घडली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने काही प्रमाणात शेतीसाठी ड्रेनेजचे पाणी वापरणाऱ्या या शेतकऱ्यांवर काळाने घाला घातल्याने शिर्डीत शोककळा पसरली आहे. संदीप कोते आणि गंगाधर गाडेकर अशी या दुर्दैवी शेतकऱ्यांची नावे आहेत. शिर्डीतील कालिकानगर भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. ड्रेनेजमध्ये उतरलेल्या दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. पाणी टंचाईमुळे काही प्रमाणात शेतकरी ड्रेनेजचे पाणी शेतीसाठी वापरतात. ड्रेनेजमध्ये लावलेल्या पाईपलाईनमध्ये झालेला बिघाड नीट करण्यासाठी संदीप कोते आणि गंगाधर गाडेकर हे दोघे शेतकरी या ड्रेनेजमध्ये उतरले. मात्र विषारी वायूने त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे संदिप कोते यांचा गुरूवारीच वाढदिवस होता आणि आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्यावर्षी देखील अशाच प्रकारे चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आजही तशाच पद्धतीने या दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.