सिंधुदुर्ग : सलग सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची गर्दी कोकणच्या समुद्र किनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. स्वच्छ समुद्र किनारे व अद्भुत निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. यामुळे सुट्ट्या लागल्यापासून किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. मालवण, देवगड, देवबाग, तारकर्ली, दांडी, चिवला समुद्र किनाऱ्यांवर सर्वाधिक पसंती दिसून येत आहे.
विविध साहसी खेळ, वॉटर स्पोर्टस्, स्कूबा, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडाप्रकारांचा आनंद लुटण्याबरोबरच धार्मिक पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची सध्या गर्दी उसळली आहे. मालवणच्या बंदरापासून ते तारकर्ली, देवबागपर्यंत सुमारे 12 कि. मी. लांबीची आकर्षक किनारपट्टी आहे. या शांत रम्य अशा ठिकाणी तंबुनिवास व रेस्टॉरंटची सोय करण्यात आली आहे. येथील किनारा जलविहारासाठीही प्रसिध्द आहे.
देवबागला तारकर्लीची खाडी व अरबी समुद्र यांचा सुरेख संगम पाहावयास मिळतो. कर्ली नदीचे विस्तीर्ण, रुंद पात्र, नदीमुखातून देवबागकडे जाताना दोन्ही किनार्यांवर दाटलेल्या हिरव्यागर्द माडांच्या व पोफळीच्या बागा, नदीचा संथ, शांत व सुरक्षित प्रवास, नदीपात्रात लागणारी छोटी मोठी नवलाईची बेटे, पात्रालगत असंख्य माडांच्या अंधारछायेत असणारी कोकणी परंपरेची घरकुले चिरकाल स्मरणात राहणारी एक आनंदयात्राच असते.
मालवण मध्ये आल्यानंतर पर्यटक समुद्र पर्यटनासोबतच खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आनंद लुटत असतात. काही पर्यटकांना तर कोकणाचे कॅलिफोर्निया व्हावे असेही वाटते. समुद्रात उभा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्या किल्यावर जाण्यासाठी पर्यटकांची मालवण जेट्टी वर मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
कोकणचे समुद्र किनारे फुलले, पर्यटकांची तोबा गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2018 07:23 PM (IST)
सुट्ट्या लागल्यापासून किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. मालवण, देवगड, देवबाग, तारकर्ली, दांडी, चिवला समुद्र किनाऱ्यांवर सर्वाधिक पसंती दिसून येत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -