मोदींच्या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी 2 कोटींची उधळपट्टी
एबीपी माझा वेब टीम | 16 Oct 2018 12:19 PM (IST)
20 हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास 40 हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण राज्य सरकारकडून केली जात आहे. येत्या 19 तारखेला शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाला माणसे जमावीत म्हणून ग्रामविकास खाते 2 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांना नाश्ता, येण्या-जाण्याची सोय आणि बसवर बॅनर लावण्यावर सरकार तिजोरीतून खर्च केला जातोय. 20 हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास 40 हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा, लाभार्थी संख्या आणि बस सुविधा - नाशिक - 20 हजार लाभार्थ्यांसाठी 400 बस अहमदनगर - 12 हजार लाभार्थ्यांसाठी 240 बस औरंगाबाद - 4 हजार लाभार्थ्यांसाठी 80 बस बीड - 2 हजार लाभार्थ्यांसाठी 40 बस पुणे - 2 हजार लाभार्थ्यांसाठी 40 बस एकूण 800 बसमधून 40 हजार लोक येणार असून, त्यासाठी 2 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलीय. धनंजय मुंडेंची जोरदार टीका "राज्य दुष्काळात होरपळत आहे, तिजोरीत खडखडाट आहे आणि राज्य कर्जबाजारी झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमा करण्यासाठी शासकीय तिजोरीतून 2 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने माणसे आणावी लागत आहेत.", अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तसेच, "आता नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली म्हणून गर्दी जमणार नाही या भीतीने गर्दी जमवण्यासाठी सरकार अधिकाऱ्यांना लेखी आदेश देत आहे. मोदींना खूष करण्यासाठी गर्दी जमवण्यात सामान्य जनतेच्या घामाचे कर रूपी जमा केलेले करोडो रुपयांचा चुराडा सरकार करत आहे. जनताच आता सरकारचा हिशेब करणार आहे.", असेही धनंजय मुंडे म्हणाले.