शिकागो : अमेरिकेतील मानाचा आईनस्टाईन पुरस्कार यंदा कोल्हापूरकराला प्राप्त झाला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन प्राध्यापक अभय आष्टेकर यांना गुरुत्वाकर्षण विज्ञान क्षेत्रातील शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. 10 हजार डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
1999 पासून महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. सध्या आष्टेकर पेन्सिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटीतील ग्रॅव्हिटेशन आणि द कॉसमॉसमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. अभय आष्टेकर यांनी सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्स या क्षेत्रातील मोलाचं संशोधन केलं आहे.
कोल्हापूरमध्ये जन्म
अभय आष्टेकर यांचा जन्म 5 जुलै 1949 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईत झालं. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. मग शिकागो विद्यापीठातून पीएचडी मिळवली. त्यानंतर त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचं काम केलं.
पुरस्काराने आनंद
अभय आष्टेकर यांनी मानाचा अल्बर्ट आईन्स्टाईन पुरस्कार घोषित झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. "शाळेत न्यूटनचा सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षणाची माहिती मिळाली होती. ज्या शक्तीमुळे कोणतीही वस्तू जमिनीवरच येते, त्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्यभोवती फिरते. हे सर्व आश्चर्यकारक होतं. त्यामुळेच मी हे समजून घेण्याचं ठरवलं होतं”, असं आष्टेकर यांनी सांगितले.
भारतीय वैज्ञानिक भौतिक आणि खगोलशास्त्रात उत्तम काम करत आहेत. या क्षेत्रात ते चीनपेक्षाही पुढे आहेत, असंही आष्टेकर यांनी सांगितलं.