पुणे : आज सकाळी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन अपघात झाले. या अपघातांमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात कामशेत पिंपोळी गावाच्या हद्दीत पुण्याहून मुंबईला येणाऱ्या लेनवर झाला. ट्रक आणि झायलो कारची धडक झाली, या धडकेत कारमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले.


दुसरा अपघात कामशेत बोगद्याजवळ मुंबईवरून पुण्याकडे येणाऱ्या कारने रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडक दिली. कार चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कारचालक यामध्ये जबर जखमी झाला आहे.

दरन्यान पुण्यात कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे भीमानदी पुलाच्या वळणावर रात्री 10 च्या सुमारास एका चारचाकी गाडीने दोन पादचारी तरुणांना धडक दिली. यामध्ये ते तरुण जागीच मृत पावले. गाडी तरुणांना धडकल्यानंतर पुलाचा कठडा तोडून खोल खड्ड्यात पडली. गाडीतील चारही जण बचावले. त्यानंतर रात्रीच त्या चौघांनी तिथून पळ काढला. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्त तरुण कोणालाही दिसले नाहीत. आज सकाळी पोलीस व स्थानिकांनी अपघातात मरण पावलेल्या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.