मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेल्या 'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या मानापमान नाट्याचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणात मनसेने 'ठाकरे' चे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या समर्थनार्थ #Isupportabhijitpanse ही मोहीम सुरु केली आहे.

मी हा चित्रपट मा. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी केला आहे, बाकी कुणी कसं वागायचं हा ज्याच्या त्याच्या संस्काराचा प्रश्न आहे, असे अभिजीत पानसे यांनी म्हटल्याचे ट्विट मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केले आहे. तर या प्रकरणावरुन सुरुवातीला सारवासारव करणारे 'ठाकरे'चे निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनीही पानसेंना चिमटा काढला आहे. लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणी कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.


दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी सारवासारव केली होती. "अभिजीत पानसे यांना काही काम होतं आणि या कार्यक्रमात सगळेच ये-जा करत असतात," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे बसण्यासाठी योग्य सीट न मिळाल्याने स्क्रीनिंग अर्धवट सोडून निघून गेले होते.

मनसेचा नवा ट्रेंड, पानसेंच्या समर्थनार्थ मोहीम
स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या मानापमानाच्या घटनेनंतर मनसेकडून अभिजीत पानसे यांच्या समर्थनार्थ #Isupportabhijitpanse ही मोहीम सुरु केली आहे.  मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मा.बाळासाहेब हे सामान्य शिवसैनिकालासुद्धा प्रेमाने वागवायचे. त्याचा अपमान नाही करायचे. हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे जो या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना सुद्धा कळला नाही', असे एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.


तर दुसऱ्या ट्वीटमध्ये ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव यांनी 'आज परत तेच झालं, शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला. पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी. राजसाहेब बरोबर बोलले होते अभिजित हे तुला फसवणार.' असे म्हटले आहे.

कुणी अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तरी लाथ कशी मारायची हे काही लोकांना तुझ्याकडून शिकण्याची गरज आहे, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.




काय आहे संपूर्ण प्रकार?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं स्क्रीनिंग त्यांच्या जयंतीला म्हणजेच 23 जानेवारीला करण्यात आलं. मुंबईतील वरळी आयनॉक्समध्ये काल संध्याकाळी साडेसात वाजता ठाकरे सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रीनिंगला पोहोचायला अभिजीत पानसे यांना उशीर झाला. मात्र दिग्दर्शक असूनही अभिजीत पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसायला नीट जागा देण्यात आली नाही. निर्माते आणि प्रिमियरच्या आयोजकांनी दिलेल्या वागणुकीमुळे पानसे काहीसे नाराज झाल्याची माहिती आहे.

नाराज झालेल्या अभिजीत पानसे यांनी स्क्रीनिंग सुरु असतानाच काढता पाय घेतला. यावेळी थिएटरबाहेर पानसे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचीही माहिती आहे. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याची खदखद अभिजीत पानसेंच्या मनात आधीपासूनच होती.

'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला संजय राऊत-अभिजीत पानसेंमध्ये खडाजंगी

थिएटरमध्ये आपल्याला पहिल्या रांगेत जागा दिल्याचा दावा अभिजीत पानसेंनी केला. तर मान्यवर आणि विशेष निमंत्रितांची विशेष आसनव्यवस्था करण्यात आली होती. पानसे उशिरा आल्यामुळे तोपर्यंत सीट्स उरल्या नव्हत्या, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.

अमेय खोपकरांचाही शिवसेनेवर निशाणा

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "अभिजित हे असं वागणं हीच त्यांची संस्कृती आहे पण महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षक हे तुझ्या पाठीशी आहेत," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. शिवाय #ISupportAbhijeetPanse या हॅशटॅगद्वारे अभिजीत पानसेंचा पाठिंबा दिला जात आहे.

मनसेच्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा, पण...

'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,' असा मजकूर असलेलं पोस्टर मनसेतर्फे लावण्यात आलं होतं. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.