पंढरपूर : शाळेत एका अनोळखी मुलीने चिठ्ठी दिल्याचा प्रयत्न केल्यानंतर अपमानित झालेल्या दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची घटना पंढरपुरात घडली आहे. मुलीने राहत्या घरी काल (23 जानेवारी) गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाखरी ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. यानंतर रात्री उशिरा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वखारी येथील माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयात संबंधित मुलगी दहावीत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेत असताना तिला एका अज्ञात मुलाने, लहान मुलाच्या हातून चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. ही घटना शाळेतील शिक्षकांनी पाहिली. त्यांनी ती चिठ्ठी ताब्यात घेत तिच्या पालकांना काल शाळेत बोलावून याची कल्पना दिली होती.

काल शाळा सुटल्यावर ही मुलगी घरी आली. दुपारी वडील जेवण करुन कामावर निघून गेले. त्यानंतर तिने स्वत:ला खोलीत बंद करुन घेतल्याने तिच्या मोठ्या बहिणीने तातडीने वडिलांना बोलावून घेतलं. ती दरवाजा उघडत नसल्याने, वडिलांनी दार तोडलं आणि आत गेले. त्यावेळी ती ओढणीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडली. वडिलांनी तातडीने तिला ग्रामस्थांच्या मदतीने दवाखान्यात हलवलं, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर वाखरीच्या ग्रामस्थांनी मुलीच्या कुटुंबीयांसह पोलिसात धाव घेतली. संपूर्ण घटनेची माहिती घेतल्याने पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढू लागल्यानंतर पोलिसांच्या 'दामिनी' पथकाची या परिसरात करडी नजर होती. मात्र तरीही मुलाने दिलेल्या चिठ्ठीमुळे अपमान सहन न झाल्याने तिने आयुष्य संपवलं.