सोलापूर : निवडणुका जवळ आल्यानंतर लोकांची मनं अपल्या बाजूला वळवण्यासाठी लोकप्रतिनीधी काय करतील याचा काही नेम नाही. सोलापुरातल्या भाजपच्या चार नगरसेवकांनी महापालिकेच्या निधीचा उपयोग करून सार्वजनिक एसी टॉयलेट्सची (शौचालयांची) उभारणी केली आहे. सोलापुरातल्या या पहिल्याच सार्वजनिक एसी टॉयलेटचे आज उद्घाटन होणार आहे.

सोलापुरातल्या चादरी आणि साड्यांच्या बाजाराजवळ गर्दीच्या ठिकाणी एसी टॉयलेट्सची उभारणी केली आहे. या भागात टॉयलेट उभारणे गरजेचे हेते. चौदा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॉयलेटमध्ये चार नगरसेवकांनी मिळून चार एसी बसवले आहेत. महिलांच्या शौचालयात दोन, चेंजिंग रूममध्ये एक आणि पुरुषांच्या शौचालयात एक असे चार एसी बसवण्यात आले आहेत.

सोलापूर हा दुष्काळी जिल्हा आहे. ज्या सोलापुरात पिण्यासाठी पाणी नाही. लोकांकडे साधं शौचालय नाही. लोक उघड्यावर शौचास जातात. अशा सोलापुरात हा एसी टॉयलेटचा फार्स कशाला? असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.

पैसै फक्त पुरुषांकडून घेणार
पे अँड यूज तत्त्वावर पुरुषांना शौचासाठी पाच रुपये आणि अंघोळीसाठी दहा रुपये द्यावे लागणार आहेत. महिलांसाठी हे टॉयलेट फ्री टू युज आहे. पुरुषांकडून जमा केलेल्या पैशातून शौचालयाच्या एसीचे दर महिन्याचे बिल भरले जाणार आहे.