चंद्रपूर : ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून बारावीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अतिशय खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. रोहित राजेंद्र जांभुळे असं या 18 वर्षीय मुलाचं नाव असून तो यंदा तो भिसी येथील आदर्श जनता विद्यालयात बारावीला आहे. धक्कादायक म्हणजे रोहितने हा मोबाईल ऑनलाईन शिक्षणासाठी मागवला होता आणि यामध्ये त्याची फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा त्याचे वडील राजेंद्र जांभुळे यांनी दावा केलाय.


चिमूर तालुक्यातील पूयारदंड येथील ही सर्व घटना असून रोहित जांभुळे या युवकाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन मोबाईल बुक केला होता. त्याची मूळ किंमत 15 हजार रुपये होती. त्यासाठी त्याने 10 हजार रुपये त्या कंपनीला ऑनलाईनच्या माध्यमातून दिले होते व उर्वरित पाच हजार रुपये मोबाईल पार्सल आल्यानंतर पोस्टमार्फत द्यायचे होते. यासाठी युवकाला पोस्टातून फोन आला. युवकाने पार्सल सोडविण्यासाठी पैसे नसल्याने आईकडे पैशाची मागणी केली. आईने पैशाची जुळवाजुळव करून मुलाला पाच हजार पोस्टामध्ये पार्सल सोडवायला दिले. सर्व प्रक्रिया पूर्ण करून कंपनीने पाठवलेले पार्सल आईने व मुलाने उघडले. मात्र त्या पार्सलमध्ये मोबाईल ऐवजी दोन पाकिटं (vallet),एक बेल्ट अशा वस्तू होत्या. युवकाला आपली मोबाईल कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांने कंपनीच्या संपर्क क्रमांकावर फोन केला. परंतु त्या कंपनीला फोनच लागत नव्हता.



घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने आणि त्यात 15 हजार रुपयांचा भुर्दंड बसल्याने आई-वडील नाराज झाले. या फसवणूकीचा मानसिक धक्का बसल्याने रोहित काल दुपारपासून घरातून बेपत्ता झाला. आईवडीलांनी नातेवाईक आणि मित्रांकडे विचारपूस केल्यावर त्याचा शोध लागला नाही. शेवटी आज सकाळी 10-11 च्या दरम्यान गावातील शेतकरी शेतात जात असताना मुलाची गाडी-कपडे विहीरीजवळ दिसल्यामुळे विहिरीत त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सापडला. रोहीतने कमरेला दगडाने भरलेली पोतडी बांधून विहीरीत उडी घेत आपला जीव दिला. या घटनेने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Satara | ऑनलाईन शिक्षणाअभावी विद्यार्थिनीची आत्महत्या; साताऱ्यातील ओंड गावातील धक्कादायक घटना