मुंबई : दागिन्यांची खरेदी करत असताना मराठीतून बोला असा आग्रह धरणाऱ्या मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी कुलाबा इथल्या ज्वेलर्सच्या विरोधात आणि मराठी अस्मितेसाठी अठरा तास ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि शिवसेनेने घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान देणाऱ्या या परप्रांतीय सोनाराला चांगलाच हिसका दाखवला.
कुलाब्याच्या महावीर ज्वेलर्स या दुकांदाराने मराठीतून बोलावं या मागणीसाठी दुकानाच्या दारात काल दुपार पासून आज सकाळी अकरा वाजेपर्यंत तब्बल सोळा तासाहून अधिक वेळ वयोवृद्ध लेखिका शोभा देशपांडे यांनी आंदोलन केले. काल दुपरी शोभा देशपांडे सोन्याचे दागिने विकत घेण्यासाठी महावीर ज्वेलर्स या दुकानात आल्या होत्या. यावेळी दागिने पाहत असताना दुकानदाराला मराठीतून माहिती देण्याची विनंती केली. याला महावीर ज्वेलर्सच्या मालकाने नकार दिला. यातून वाद निर्माण झाला. तुम्हाला हिंदी येत नाही तर मी तुम्हाला वस्तू विकणार नाही, असं म्हणत या दुकानदाराने शोभा देशपांडे यांच्या हातातील वस्तू काढून घेऊन त्यांना दुकानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शोभा देशपांडे यांनी या दुकानाचा परवाना दाखवण्यास सांगितले. यालाही दुकानदाराने नकार दिला. यावेळी पुन्हा शोभा देशपांडे आणि दुकानदार यांच्यात वाद वाढला. दुकानदाराने स्थानिक पोलिसांना बोलावून शोभा देशपांडे यांना दुकानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी देखील शोभा देशपांडे यांची बाजू ऐकून न घेता महिला पोलिस कॉन्स्टेबलने या वयोवृद्ध लेखिकेला दुकानाच्या बाहेर काढलं. या प्रकारामुळे संतापलेल्या शोभा देशपांडे यांनी या दुकानाच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं.
मराठी अस्मितेसाठी शोभा देशपांडे यांनी आंदोलन सुरू केल्याची बातमी एबीपी माझा वर येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तात्काळ त्याची दखल घेत ते कुलाब्याला पोहोचले. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील या ठिकाणी दाखल झाले होते. त्यानी शोभा देशपांडे यांच्या सोबत बातचित केल्यानंतर पोलिसांना धारेवर धरलं . एक वयोवृद्ध स्त्री या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि याची गंभीर दखल पोलिसांनी न घेतल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी या दुकानाचा मालक याला घटनास्थळी घेऊन आलेत. या वेळी संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठोका पडताच दुकानाच्या मालकाने शोभा देशपांडे यांच्या पायांवर हात ठेवून घडल्या प्रकारा बदल माफी मागितली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी या दुकानाच्या मालकाला ताबडतोब त्या ठिकाणाहून हलवलं. जोपर्यंत दुकानाचा मालक आपल्याला व्यवसाय परवाना दाखवत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सोडणार नाही, असा पवित्रा शोभा देशपांडे यांनी घेतला. यावेळी पोलीस आणि संदीप देशपांडे यांनी मध्यस्थी करून देशपांडे यांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती केली. वय जास्त असल्याने देशपांडे यांची प्रकृती खालावू नये आणि त्यातून इतर समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी मनसेच्या वतीने त्यांना आंदोलन समाप्त करण्याची विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंतीला मान देत शोभा देशपांडे यानी आंदोलन समाप्त केलं. मराठी अस्मितेसाठी नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रस्थानी असते . यापुढे पुन्हा मराठी भाषा आणि मराठी अस्मिते साठी मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
मराठी भाषेसाठी एक महिला आंदोलन करत असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना मिळाली. त्यांनी देखील घटनास्थळी येऊन शोभा देशपांडे यांची भेट घेतली. मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या या वाघिणीचं कौतुक करत यापुढे असले प्रकार महाराष्ट्रात खपून घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. घडल्या प्रकाराची राज्य सरकार गंभीर दखल घेणार असून हे प्रकरण आम्ही तडीस नेऊ असा अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. दरम्यान स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून शोभा देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. प्रथम आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही आंदोलन केलं ते एकदम बरोबर आहे. आम्ही तुमच्यासोबत नेहमीच आहोत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
एका परप्रांतीय दुकानदाराने महाराष्ट्रातच आपला उद्योग सुरू केला आणि मराठी बोलालयला नकार देत तुम्हाला हिंदी येत नाही तर मी तुम्हाला वस्तू विकणार नाही. असा पवित्रा घेत त्यांने मुजोरपणा केला. त्याची ही घमेंड शोभा देशपांडे यांनी मोडली. या दुकानदाराकडे दुकानाचा परवाना आहे का ? तसेच इतर परवाने त्याने रीतसर प्रशासनाकडून घेतलेले आहेत का ? याची चौकशी स्थानिक पोलिस करत आहेत . मात्र एकूणच मराठी भाषेसाठी तब्बल सोळा तासाहून अधिक काळ एक वयोवृद्ध महिला अखंडपणे भांडत होती. यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईमध्ये मराठी भाषा, परप्रांतीयांची घुसखोरी आणि दुकानाबाहेरील मराठी फलकांचा मुद्दा नक्कीच तापणार आहे, यात शंका नाही.